भगतसिंग यांच्या आयुष्यातले शेवटचे 12 तास कसे होते?
भगतसिंग यांच्या आयुष्यातले शेवटचे 12 तास कसे होते?
लाहोर सेंट्रल जेलमधील 23 मार्च 1931 ची सुरुवात इतर दिवसांसारखीच होती. सकाळी सकाळी आलेलं वादळ वगळल्यास इतर गोष्टी सारख्याच होत्या.
भगतसिंग यांना पुस्तकं वाचनाचा छंद होता. त्यांनी एकदा त्यांच्या शाळेतील मित्र जयदेव कपूर यांना पत्रात कुलबीर यांच्या माध्यमातून काही पुस्तकं पाठवण्याची विनंती केली होती. त्यात कार्ल लिबनेख्त यांचं 'मिलिट्रिझम', लेनिन यांचं 'लेफ्ट विंग कम्युनिझम' आणि आप्टन सिंक्लेयर यांच्या 'द स्पाय' या पुस्तकांचा समावेश होता.
भगतसिंग यांचं तुरुंगातील आयुष्य फारच खडतर होतं. त्यांच्या कोठडी क्रमांक 14 ची फरशी नीट नव्हती. फरशी इतकी खराब अवस्थेत होती की, गवत उगवलं होत. भगतसिंग यांचं पाच फूट दह इंचाचं शरीर कसंतरी त्या कोठडीत झोपू शकेल, एवढीच ती कोठडी होती.
भगतसिंग यांना फाशी देण्याच्या दोन तास आधी त्यांचे वकील प्राणनाथ मेहता त्यांना भेटण्यासाठी पोहोचले होते. मेहता यांनी नंतर लिहिलंय की, भगतसिंग त्यांच्या छोट्याशा कोठडीत एखाद्या वाघाप्रमाणे फेऱ्या मारत होते.
'इंकलाब जिंदाबाद'
भगतसिंग यांनी हसत हसतच मेहतांचं स्वागत केलं आणि विचारलं, तुम्ही माझं 'रिव्हॉल्युशनरी लेनिन' पुस्तक आणलं नाही का?
मेहतांनी ते पुस्तक दिल्यानंतर भगतसिंग यांनी तातडीने ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. त्यांनी एवढ्या तातडीने पुस्तक वाचायला सुरुवात केली, जसं की त्यांच्याकडे आता वेळच उरला नाही. मेहतांनी त्यांना विचारलं, "तुम्ही देशाला काही संदेश देऊ इच्छित आहात?" तेव्हा भगतसिंग यांनी पुस्तक वाचतानाच म्हटलं, "केवळ दोन संदेश... साम्राज्यवाद मुर्दाबाद आणि इंकलाब जिंदाबाद!"
त्यानंतर भगतसिंग यांनी मेहता यांना सांगितलं की, "पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांना धन्यवाद सांगा. या दोघांनीही माझ्या खटल्यात गांभिर्यानं लक्ष घातलं."
मेहता निघून गेल्यानंतर तुरुंगाधिकाऱ्यांनी तिन्ही क्रांतिकाराकांना सांगितलं की, त्यांना नियोजित वेळेच्या 12 तास आधीच फाशी दिली जाणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता फाशी देण्याऐवजी त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजता फाशी दिली जाईल.
मेहतांनी दिलेल्या पुस्तकाची काही पानंच भगतसिंग वाचू शकले होते. भगतसिंग यांच्या तोंडून शब्द निघाले, "तुम्ही मला या पुस्तकाचं एक प्रकरणही पूर्ण वाचू देणार नाही का?"
थोड्या वेळाने तिन्ही क्रांतिकारकांना फाशीच्या तयारीसाठी कोठडीतून बाहेर नेण्यात आलं. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी हात जोडले आणि आवडतं स्वातंत्र्यगीत गाण्यास सुरुवात केली :
कभी वो दिन भी आएगा
कि जब आज़ाद हम होंगें
ये अपनी ही ज़मीं होगी
ये अपना आसमाँ होगा.
त्यानंतर तिघांचंही एक एक करून वजन मोजलं गेलं. तिघांचंही वजन वाढलं होतं. शेवटची अंघोळ करण्यास तिघांनाही सांगण्यात आलं. त्यानंतर काळे कपडे परिधान करण्यास दिले गेले. मात्र, त्यांचे चेहरे उघडेच ठेवण्यात आले.
चरत सिंह हे भगतसिंग यांच्या कानाशी पुटपुटले, वाहे गुरुला आठवा. भगतसिंग म्हणाले, *"संपूर्ण आयुष्यात मी ईश्वराची आठवण काढली नाही. अनेकदा तर गरिबांना होणाऱ्या त्रासामुळे ईश्वारावर टीकाही केलीय. जर मी आता त्याची माफी मागितली, तर तो म्हणेल याच्यापेक्षा घाबरट कुणी नाही. याचा शेवट जवळ येतोय. त्यामुळे हा माफी मागायला आलाय."*
तुरुंगाच्या घड्याळात संध्याकाळचे सहा वाजले. कैद्यांना दुरुनच कुणी चालत येत असल्याचे आवाज येऊ लागले. सोबत एका गाण्याचा आवाजही येऊ लागला, "सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है..."
सगळ्यांनी 'इंकलाब जिंदाबाद' आणि 'हिंदुस्तान आजाद हो' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. फाशीचा दोरखंड जुना होता, मात्र फाशी देणारे तंदुरुस्त होते. फाशी देण्यासाठी लाहोरजवळील शाहदरा येथून जल्लाद बोलावण्यात आला होता. भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या मधे उभे होते. भगतसिंग हे आईला दिलेला शब्द पूर्ण करू इच्छित होते. फाशीवेळी 'इन्कलाब जिंदाबाद'ची घोषणा त्यांना द्यायची होती.
लाहोर जिल्हा काँग्रेसचे सचिव पिंडी दास सोंधी यांच्या घराच्या अगजदी जवळच लाहोर सेंट्रल जेल होतं. भगतसिंग यांनी एवढ्या मोठ्या आवाजात 'इंकलाब जिंदाबाद'ची घोषणा दिली होती की, सोंधी यांच्या घरापर्यंत ऐकायला आलं. भगतसिंग यांचा आवाज ऐकताच तुरुंगातील इतर कैदीही घोषणा देऊ लागले. तिन्ही क्रांतिकारकांच्या गळात फाशीचा दोर बांधण्यात आला. त्यांचे हात-पाय बांधण्यात आले. तेव्हा जल्लादाने विचारलं, सर्वांत आधी कोण फासावर जाईल?सुखदेव यांनी सर्वात आधी फासावर जाण्याबाबत होकार दिला. जल्लादाने एक एक करुन दोरखंड खेचला आणि त्यांच्या पायाखाली आधारासाठी असलेल्या ठोकळ्याला पाय मारून हटवलं. बराच वेळ तिघांचेही मृतदेह लटकलेलेच होते.
नंतर तिघांचेही मृतदेह खाली उतरवले गेले. तिथं उपस्थित असलेले लेफ्टनंट कर्नल जेजे नेल्सन आणि लेफ्टनंट कर्नल एनएस सोधी यांनी तिघांनाही मृत घोषित केलं.
कुणालाही या गोष्टीचा अंदाज नव्हता की, या फाशीच्या 16 वर्षांनंतर भारतातील ब्रिटीश साम्राज्याचा अंत होईल आणि भारतीय भूमीवरून ब्रिटीश कायमचे निघून जातील.
अशा सच्चा देशभक्त, कम्युनिस्ट आणि नास्तिक असलेल्या धैर्यवान भगतसिंगांना सलाम...
Comments
Post a Comment