वृद्धाश्रम आणि सून ....
वृद्धाश्रम आणि सून ....
वृद्धाश्रमात राहावे लागणे, यासारखे दुःख भारतीय मनासाठी दुसरे कोणते नाही परंतु या दुःखासाठी सुनेला/सुनांना जवाबदार धरणे म्हणजे ख-याला सोडून दुस-यालाच पकडण्यासारखे आहे. हा विषय खूप मोठा आहे. वृद्धाश्रमातल्या प्रत्येक दुःखामागे एक कहाणी आहे, आणि सगळ्यांचे उत्तर "सून" इतके साधे सरळ असु शकत नाही. मग सुनेवर दोषारोप करण्याचा किंवा खापर फोडण्याचा मार्ग का निवडला जात असावा?
आपला मुलगा आपल्याला सांभाळायला तयार नाही याचा अर्थ त्याला संस्कार देण्यात आपण कमी पडलो, आपलेच नाणे खोटे असा होतो. पण हे जाहीरपणे मान्य करायला कमीपणा वाटतो, अहंकार दुखावतो, मग तो साधा भोळा आहे आणि सूनच कशी जवाबदार आहे, अशा कथा तयार होतात. "नावडतीचे मीठ अळणी" किंवा "दृष्टी तशी सृष्टी" या न्यायाने पुरावेसुद्धा सापडतात, साधारणपणे हेच होतं.(अपवाद असू शकतात)
आई वडिलांची सेवा करणे मुलाचे कर्तव्य आहे हे आपल्या संस्कृतीत सांगितले गेलेलं आहे. श्रावणबाळ हा आदर्श आहे, इथे सुन कुठे येते? पण आजकाल लग्न झालं की मुलगा बायकोला आई वडील सोपवून मोकळा होतो, एखाद्या मॅनेजरसारख्या आदेश देत चुका काढतो, सासु सासरे सुद्धा आपल्या आदरात आणि सेवेत ही मुलगी कुठे कमी पडतेय त्या चुका शोधत बसतात. तक्रार करतातच असं नाही पण मनातल्या मनात खट्टू होतात.
खरंतर मुलाची भूमिका महत्वाची आहे. आई वडिलांची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे, बायको ही माझ्या आयुष्यातली सहप्रवासी आहे, लग्नामुळे मला एक सोबत मिळाली, सुख दुःखात एक मैत्रिण मिळालेली आहे, तिच्या येण्याने मला कर्तव्ये पूर्ण करायला उर्जा मिळाली, आता मी माझी जवाबदारी नीट पार पडू शकेन ! असा दृष्टीकोन असावा.
या जागी "आता तू माझ्या आई वडिलांना सांभाळ त्याचं सगळं कर" असं म्हणुन होणारी गंमत बघत बघ्याची भूमिका मुलं घेतात, वर तुमच्या वादाचा मलाच कसा त्रास होतो असा उलट कांगावाही करतात.
काय हरकत आहे आई वडिलांना चहा करून द्यायला, टी.व्ही. बंद करून त्यांच्याशी गप्पा मारायला त्यांना फिरायला न्यायला, बायको ‘नाही’ म्हणते का तुम्हालाच न्यायचं नसतं? व्यसनांसाठी बायकोशी जीवाच्या आकांताने भांडणारे, "मला आईची सेवा करू दे" म्हणून कुठे भांडताना दिसत नाहीत.
मुलाने बायकोला लग्नाच्या वेळीच निक्षून सांगावे की, "मी आई वडिलांची सेवा करणारच, या प्रवासात तू आलीस तर सोबत नाही तर एकटा !"
वेगळे रहावे लागले तरी दोन्ही घरी संतुलन ठेवता येते, एकमेकांच्या कर्तव्यात आड येऊ नये इतकी काळजी घेतली तरी ही कर्तव्ये पूर्ण करता येतात. आपल्याला वापरून घेण्याचा हेतू आहे असं कोणालाही कळलं की तो विरोधात जातोच इथे सुनेलाही तेच वाटतं.
आपण काय करायचे हे आपण ठरवू शकतो त्यामुळे दुस-याकडून करवुन घेण्याचे कष्ट करण्यापेक्षा आपणच आपल्या आई वडिलांची जवाबदारी घ्यावी. हेतू शुद्ध असेल आणि तिरस्कार नसेल तर सुना सुद्धा मदतीला पुढे येतीलच. पण सगळे त्यांच्या खांद्यावर टाकले, तर घराघरातला हा संघर्ष संपणार नाही, आणि वृद्धाश्रम बंद होणार नाहीत.
म्हणूनच पुरुषांनी फक्त "आई वडील ही माझ्या एकट्याची जवाबदारी आहे" (भाऊ भाऊ असतील तर आमची जवाबदारी आहे) असं म्हणा, बायकोवर/ सुनांवर तुमची जवाबदारी टाकू नका फक्त इतकेच केल्याने खूप मोठा फरक पडतो. चित्र बदलते.
ड्रायवरची सीट घ्या, याचा फायदा असा की सुनेच्या खांद्यावरचे ओझे कमी होते, अपराधी भाव संपतो, तिच्या मनावरचा ताण संपतो, यात आई म्हणुन मुलांचेही करावे लागत असेल तर तिला खूपच आराम मिळतो. पुरुषांनी फक्त आई वडिलांची जवाबदारी हाती घेऊन स्त्रीला अपराधी भावनेतून मुक्त केलं तर घराघरात चमत्कार होतील, काहीच करू नका, फक्त तिला अपराधी भावनेतून मुक्त करा.
तुझे सासू सासरे न म्हणता माझे आई बाबा म्हणा आणि मग पहा चित्र बदलेल. आई वडिलांनी मुलाला हक्काने हाक मारायची सवय करुन घ्या कारण त्याच्यावर आपला हक्क आहे आपण लाडाने आयुष्य खर्चून त्याला मोठे केलेलं आहे.
स्त्री लढणा-या पुरुषाच्या मागे शक्ती बनून आधार द्यायला तयार होते त्याचा आदरही करते, पण तिला पुढे करून मागे राहाणा-या बद्दल तिला सहानुभूती वाटत नाही, हे एक वास्तव आहे.
म्हणून आई वडिलांना सांभाळण्याची जवाबदारी "माझी" म्हणा "तुझी" म्हणुन तिच्या गळ्यात टाकू नका. काय सेवा करायची आहे ती उठून स्वतः करायला सुरुवात करा, बायको मुलं आपोआप या सेवेत सहभागी होतील, नाही झाले तरी या पुण्यासाठी तयार राहा. आपल्या आई वडिलांच्या आनंदी वृद्धापकाळासाठी कोणावर अवलंबून राहू नका, जर ... तर... पेक्षा दृढ निश्चय असेल तर कोणतेही आई वडील वृद्धाश्रमात जाणार नाहीत. कर्तव्य पूर्ण करण्यासाठी जे ठामपणे स्वतः उभे राहतात त्यांच्या मदतीला सगळे येतात आणि जे टाळाटाळ करतात त्यांची कामं आयती करून द्यायला कोणी ही येत नाही.
माझ्या सर्व मित्र-मैत्रीणी, भाऊ-भगिनींना समर्पित .... 🙏🙏🙏🙏
वाॅटसपवर आलेली पोस्ट
लेखकाचे नाव माहित नाही लेखक -अनामिक
सर्व हक्क लेखकाला
Comments
Post a Comment